वाघोली- वाघोली कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे भाजीपाला व इतर दुकाने चालू करणाऱ्या व्यावसायिकांवर ग्रामपंचायत कर्मचारी गुन्हा दाखल करणार आहेत. याबाबतचे पत्र ग्रामपंचायत व वाघोली करोना विषाणूपातळीवरील संनियंत्रण समिती व आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण समितीमार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. वाघोली गाव पुणे शहरालगत असून शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाघोली गावामध्ये सर्व ठिकाणी जाऊन कोणी दुकान सुरू केले असल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामपंचायत, संनियंत्रण समिती व आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण समिती वाघोलीमार्फत अधिकार दिले आहेत. वाघोलीतील भाजीपाला विक्रेते व अन्य दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवार (दि. 8) पासून दुकाने चालू ठेवणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायत कर्मचारी तुषार वाघमारे यांनी सांगितले.