नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC
— ANI (@ANI) December 30, 2022
या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे.