मुंबई – तृणमूल कॉंग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत सेबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेअर बाजारातील कथित अफरातफरीच्या चौकशीची मागणी त्या भेटीत करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल्स) निष्कर्ष जाहीर झाले. बहुतांश चाचण्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए घवघवीत यश मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठी उसळी घेतली.
प्रत्यक्षात एनडीएचा निसटता विजय झाला. तो निकाल जाहीर झाल्यानंतर निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३० लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले. त्या घडामोडींचा आधार घेऊन विरोधी पक्ष शेअर बाजारात प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप करत आहेत.
तृणमूलने आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारत थेट सेबीचा दरवाजा ठोठावला. त्या पक्षाच्या शिष्टमंडळात कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष आणि साकेत गोखले या खासदारांचा समावेश होता. त्यांच्या समवेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण हेही होते.
सेबी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी त्या संस्थेवर विश्वास असल्याने चौकशीची मागणी करत असल्याचे नमूद केले. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना निकालाआधी खरेदी केल्यास लाभ मिळेल अशा आशयाची वक्तव्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारावेळी करत होते.
छोट्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढीस लागावा यासाठी आम्हाला चौकशी हवी आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा फटका त्या गुंतवणूकदारांना बसला.
मात्र, राजकीय नेत्यांच्या कुटूंबीयांनी कोट्यवधींची कमाई केली. एक्झिट पोल्स घेणाऱ्या संस्थांचे राजकीय नेत्यांशी कुठले कनेक्शन आहे का याविषयी चौकशीची मागणीही आम्ही केली, असे त्यांनी सांगितले.
सेबी अधिकाऱ्यांची भेट घेण्याआधी तृणमूलच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी तृणमूलच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.