– अमित डोंगरे
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पार्नेल हा एक असामान्य खेळाडू. मात्र, जे कारकीर्द सुरू होत असतानाच संजय दत्तच्या बाबतीत घडले तेच थोड्याफार फरकाने पार्नेलच्याही बाबतीत घडले. एका रेव्ह पार्टीत पोलिसांकडून पकडला गेल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वाला तो ड्रगीस्ट असल्याची चाहूल लागली. राहुल शर्मा नावाचा एक भारतीय खेळाडू देखील त्यावेळी त्याच्यासह होता. मात्र, आपण नाही त्यातले अशी भूमिका या दोघांनीही घेतली होती. ही घटना आयपीएलदरम्यानच काही वर्षांपूर्वी घडली होती.
नाट्यमय घडामोडींनतर या प्रकरणाची वाच्यताच कुठे फारशी झाली नाही. मात्र, त्यानंतरही पार्नेल अनेक विवादांनी घेरला गेला होता. त्याने आपला धर्मही बदलला. तरीही एक काळ असा आला की त्याला आपल्या कारकिर्दीची कशी वाट लागत आहे याचा साक्षात्कार झाला व खरोखरच एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी स्क्रीप्ट त्याने लिहिली व या मार्गावरून तो परतला. त्यावेळी त्याला अचानक कसे सोडून देण्यात आले त्याबबातही अद्याप कुठे कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही. असे या वादग्रस्त घटनांपासून बोध घेत तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. केवळ परतलाच नाही तर प्रचंड यशस्वीही ठरला.
2011 साली त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2012 साली तो पुणे वॉरिअर्सचाही भाग होता. त्यानंतर या घडलेल्या नामुष्कीजनक घटनांनंतर तो गायब झाला ते थेट 2014 सालानंतर यंदा उगवला. यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने जायबंदी झालेल्या रीस टोपली याच्या जागी 30 वर्षीय वेन पार्नेलला आपल्या संघात घेतले. रनेलला बोलावले आहे.
लखनौ विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळताना तब्बल 9 वर्षांनंतर त्याने अफलातून कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये पहिल्याच षटकात दीपक हुडा आणि कृणाल पांड्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने एकूण 41 धावा देताना 3 गडी बाद केले व पुनरागमन साजरे केले. यंदाच्या स्पर्धेत पुनरागमन करताना त्याने आपण ही दुसरी इनिंग सुरू करत आहोत व त्यात यशस्वीही होऊ याचाच दाखला दिला आहे. त्याची वाटचाल व कारकीर्द नवोदितांसाठी एक शिकवणीच ठरेल यात शंका नाही.