नारायणगाव (पुणे) -उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड विभागासाठी जुन्नर येथे अपर पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती करण्याची मागणी अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष संजय कुऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे 36 पोलीस स्टेशन आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक पदासोबत रेखरेख करण्याकरिता 2 अपर पोलीस अधीक्षक पदे आहेत. त्यात नुकतेच बारामती विभागाला स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षकपद देण्यात आले आहे. त्याचे कामकाज अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते हे पाहतात. तर उर्वरित भागासाठी एकच पद असून ते कामकाज विवेक पाटील हे पाहत आहेत. खेड विभागात दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी, औद्योगिकीकरण अशा कारणांनी परिस्थिती लक्षात घेता स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक पद मंजूर होणे गरजेचे आहे. या विभागाची राजकीय, सामाजिक, धार्मिक, वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. काही संवेदनशील घटना वारंवार घडत असल्याने अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्णायक भूमिकेला महत्व असते. यासंदर्भात संजय कुऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पत्रव्यवहार करून जुन्नर, आंबेगाव व खेड विभागासाठी अपर पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती करण्याची मागणी केली होती.
- पाषाणचे कार्यालय खेडला हलविण्याचा प्रस्ताव
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी 24 ऑक्टोबर 2019 ला विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या माध्यमातून प्रास्तव मंजुरीसाठी पोलीस महासंचालक यांच्याकडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांचे कार्यालय चव्हाणनगर पाषाण, पुणे ऐवजी खेड येथे मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे पत्र दि. 9 नोंव्हेबर 2020 ला दिले आहे. मात्र बारामती विभागाप्रमाणे जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीत जुन्नर येथे अपर पोलीस अधीक्षक पदाचे कार्यालय करण्यात यावे, अशी मागणी कुऱ्हाडे यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.