नवी दिल्ली – जगभरात सध्या भोंदू बाबांचा मोठा सुळसुळाट आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील भोंदू बाबांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचं एका घटनेमुळे समोर आलं आहे. थायलंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी छैयफुम प्रांतातून एका विक्षिप्त भोंदू बाबाला अटक केली आहे.
हा भोंदू बाबा एक पंथ चालवतो, ज्यामध्ये त्यांचे अनुयायी मृतदेहांची पूजा करत असत. बाबा भक्तांना लघवी प्यायला लावायचा आणि कफ खायला सांगायचा. पोलिसांनी या बाबाला जंगलातून अटक केली असून त्याच्या आश्रमातून 11 मृतदेह सापडले आहेत. थवी नानारा (75) असे या बाबाचे नाव आहे.
थवी नानारा हा जंगलात तळ ठोकून राहायचा, या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना माहिती देणाऱ्या एका महिलेने सांगितले की तिची आई बाबांकडे गेली होती. परंतु आता तिला परत येऊ दिले जात नाही.
पोलीस जेव्हा बाबाला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचे अनुयायी एकमेकांशी भिडले. तसेच बाबाला घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सांगितले की, हा बाबा एका दुर्गम गावातील जंगलात चार वर्षे आपला संप्रदाय चालवत होता. त्यामुळे त्याचा कधीच पत्ता लागला नाही. थवी आपल्या डझनभर शिष्यांसह जंगलात राहत होता. तो राहात असलेल्या भागात 11 मृतदेह सापडले. हे मृतदेह घराभोवती विखुरलेल्या अवस्थेत होते. हे मृतदेह त्यांच्या अनुयायांचे असल्याचे मानले जाते.
मृतदेहांबद्दल थवी बाबा म्हणाला की, या लोकांच्या आत्मा स्वर्गात परत जाईपर्यंत आपण मृतदेह साठवून ठेवले.
शिष्यांना लघवी प्यायला दिली
पोलिसांच्या छाप्याच्या वेळी शिष्यांनी सांगितले की, बाबा त्यांच्या लघवीने आणि कफाने रोग बरे करतात. बाबाच्या आश्रमाबाहेर पाच शवपेट्यांमध्ये मृतदेह आढळून आले असून मृतदेहातून येणारे द्रव बाहेर पडावे म्हणून सर्व शवपेट्यांना छिद्रे पाडण्यात आली होती. थवी बाबाने अधिकाऱ्यांना सांगितले की त्याचे सर्व शिष्य स्वेच्छेने येथे आले आहेत. येथे राहण्यासाठी आपण कोणाला भाग पाडले नाही.
धक्कादायक खुलासे
53 वर्षीय खुन जेनजीराने त्याच्या आईला घरी परत येऊ दिले जात नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली होती. ती म्हणाली, ‘मी आईला भेटायला गेले होते. मी तिथे पाहिलं की एक महिला लोकांना ड्रेस कोड पाळायला सांगत होती. तिथे जाण्याआधी प्रत्येकाला शूज काढावे लागले. तिथं ‘मी माझ्या आईला बाबांचा कफ चेहऱ्यावर लावताना पाहिले. ती त्याची थुंकी पीत होती. तिथेच बाबांच्या 11 भक्तांचे मृतदेह होते. जेनजीरा म्हणाली, माझ्या आईनेही सांगितले होते की, मी मेल्यानंतर तिचा मृतदेह तिथेच सोडावा.
दरम्यान थवी याला अटक करण्यात आली असून त्याला जामीन मिळालेला नाही.