वाल्हे, (वार्ताहर) – राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा दोन महिन्यांचा कालावधी संपला असून 11 मार्च पासून परत गायीच्या दुधाचा दर 3.5 फॅटसाठी 27 रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर 26 रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकर्यांसाठी मृगजळ ठरले आहे.
दुधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकर्यांना प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारकडून घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यांचा अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरीवर्गाला अजूनही अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडून, जाहीर केलेले अनुदान कधी मिळणार ? या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.
पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून चार्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना त्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत आहे. मात्र, दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरामधील दूध संघाने शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान अद्यापपर्यंत दिले नाही. त्यामुळे शेतकर्यांचा दूध दराचा प्रश्न जैसे थेच राहिला आहे दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा; शेतकर्यांची मागणी.
राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करा, शिवाय दुधाला नैसर्गिकरीत्या दरात वाढ मिळत नाही. तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा; पुरंदर तालुक्यात तीव्र चारा-पाणीटंचाई निर्माण झाली आहे; वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध व्यवसाय शेतकर्यांना परवडत नाही; त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकर्यांचे दूध व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नसल्याचे, दुध उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
दूध संघांचे काम काय ?
संघांनी प्रत्येक उत्पादकांकडून खरेदी केलेले दूध त्यांच्या बँक खात्याचा तपशील, गायींचे टॅगचे क्रमांक, फार्मर आयडी क्रमांक ही सर्व माहिती भारत पशुधन अॅपवर भरावयाची आहे. त्यानंतर ही माहिती सरकारकडून तपासली जाऊन अनुदान वितरित होते.अनेक दूध उत्पादक हे अशिक्षित आहेत. सरकारने अनुदानासाठी जाचक निकष लावले आहेत. योजनेची मुदत 10 मार्चअखेर संपली आहे.
ऐन दुष्काळात दुधाचे दर कमी होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अद्याप मिळाले नाही; दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने 25 ते 26 रुपयाने दूध दर मिळत आहे; त्यामुळे लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा. – धनंजय गायकवाड, शेतकरी, वाल्हे