नवी दिल्ली -कोविशिल्ड लसीच्या बुस्टर डोसला परवानगी मिळावी यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासंदर्भातील अर्ज कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) सादर केला आहे.
देशात सध्या कोविशिल्डचा पुरेसा साठा आहे. करोनाच्या नव्या अवतारामुळे देशातील जनतेकडून बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांनी बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया याआधीच सुरू केली आहे, असे सीरमच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
ओमायक्रॉन हा करोनाचा नवा प्रकार काही देशांत आढळल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. त्यातून भारतातही बुस्टर डोसचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही राज्यांनी बुस्टर डोसला परवानगी देण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरला आहे. केंद्र सरकारनेही बुस्टर डोसच्या गरजेवर तज्ञांच्या गटाकडून विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले आहे.
त्यापार्श्वभूमीवर, सीरमने सादर केलेल्या अर्जाचे महत्व वाढले आहे. आता कोविशिल्डच्या बुस्टर डोसला हिरवा कंदील मिळणार का याविषयी उत्सुकता आहे. ती परवानगी मिळाल्यास कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस मिळू शकेल.