Covid-19 Vaccine | राज्यात लसीचा तुटवडा; अनेक लसीकरण केंद्रे बंद

मुंबई – करोना विरोधी लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांवर लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबईतील 26 लसीकरण केंद्रे आज बंद करावी लागली. बंद करण्यात आलेल्या केंद्रांपैकी 23 केंद्रे नवी मुंबईतील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधिक लसींची मागणी करण्यात आली आहे. अधिक लसींसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्‍टर हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली आहे.

काल संध्याकाळीही राज्यातील काही ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. सांगली, सातारा, पनवेल या ठिकाणी लसीकरण थांबवावे लागले होते, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पुण्यामध्येही 100 लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबवावे लागले होते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लसींच्या उपलब्धतेबाबत महाराष्ट्राला डावलले जात असल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात दर आठवड्याला 40 लाख आणि महिन्याला 1.6 कोटी लसींची गरज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातपेक्षा दुप्पट आहे. मात्र गुजरातला एक कोटी डोस दिले गेले आहेत आणि महाराष्ट्रालाही तेवढेच डोस दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राकडून मिळणाऱ्या डोसची संख्या 7 लाखावरून 17 लाख करण्यात आली आहे. मात्र 40 लाख डोसची गरज असल्याने 17 लाख डोसची संख्या खूपच कमी आहे. पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या करोना आढाव्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले, याशिवाय रेमडेसिविरचा पुरवठा, ऑक्‍सिजन सिलिंडरच्या किमतींवर नियंत्रण, ऑक्‍सिजनचा पुरवठा आणि व्हेंटिलेटर ऑपरेशन सपोर्ट हे मुद्देही पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत उपस्थित केले जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.