गांधीनगर – करोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी गुजरातमधील 8 शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वडोदरा, गांधीनगर, सुरत, राजकोट, अहमदाबाद, भावनगर, जामनगर आणि जुनागढ या शहरांमध्ये ही रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. या शहरांमध्ये रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
गुजरातमधील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता पूर्वीपेक्षा बरीच आटोक्यात आली आहे. मात्र, तरीही नव्याने प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. साथ आटोक्यात राखण्यासाठी ही रात्रीची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गुजरातमध्ये सध्या करोना रुग्णांची संख्या 8.25 लाख इतकी आहे, तर 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने 2 सप्टेंबरपासून इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गांसाठीचे वर्ग सुरू केले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शाळेमध्ये 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.