“एचसीएमटीआर’साठी कॅन्टोन्मेंट हद्दीतही मोजणी

बोर्डाची परवानगी : संरक्षण, लष्कराच्या मालमत्तांसाठी स्वतंत्र परवानगी
पुणे – महापालिकेच्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्पासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यातील जागेवर (सी लॅंड) मोजणीची मुभा देण्यात आली आहे. ही परवानगी फक्‍त बोर्डाच्या ताब्यातील जागेबाबत असून,संरक्षण मालमत्ता, लष्कराच्या जागेत मोजणी करण्यासाठी संबंधित विभागांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

शहरांतर्गत जलद वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे 36 किलोमीटरचा उन्नत रिंगरोड विकसित केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विविध सरकारी विभागांची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिका आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांमार्फत संयुक्‍त मोजणी केली जात आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेमध्ये संरक्षण विभागाच्या जागेचाही समावेश आहे. त्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्थानिक लष्करी प्रशासन, संरक्षण मालमत्ता विभाग अशा विविध विभागांच्या जागेची गरज भासणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट क्वार्टर्सपासून लुल्लानगर ते भैरोबा नाला चौकापर्यंत सर्वेक्षण करून मोजणी करण्यास परवानगी देण्याचे पत्र महापालिकेच्या भूसंपादन व व्यवस्थापन विभागातर्फे बोर्डाकडे सादर करण्यात आले होते. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, बोर्डातर्फे केवळ कॅन्टोन्मेंट लॅंडवर मोजणीस संमती देण्यात आली असून उर्वरित विभागांच्या जागेत मोजणी करण्यासाठी पालिकेला त्यांची संमती घ्यावी लागेल, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)