पुणे – दि कॉसमॉस को.ऑप. बॅंक लि. या मल्टिस्टेट शेडयूल्ड बॅंकेला दि.31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रू.56.78 कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी जाहीर केले.
मार्च 2021 अखेर संपलेल्या वर्षात बॅंकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असून एकूण निधी रू.1,738 कोटी झाला आहे तर बॅंकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर ) 12.54 टक्के आहे. सन 2020.21 या आर्थिक वर्षाकरिता सभासदांनी केलेल्या शिफारशीनुसार 8 टक्के लाभांश वाटपास परवानगी देण्याची शिफारस रिझर्व्ह बॅंकेकडे करण्यात येणार आहे.
बॅंकेची 115 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी झाली. बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बॅंकेच्या ठेवी रू.16,150 कोटींवर पोहोचल्या असून, यामध्ये गतवर्षीपेक्षा रू.955 कोटींनी वाढ झाली.
बॅंकेने रू.11,880 कोटींचे कर्जवितरण केले असून, यामध्ये गतवर्षीपेक्षा रू.377 कोटींनी वाढ झाली आहे. सन 2020.21 या आर्थिक वर्षात बॅंकेचा एकूण व्यवसाय रू.28,030 कोटी झाला. गतवर्षीपेक्षा एकूण व्यवसायात मार्च 2021 अखेर रू. 1,332 कोटींनी वाढ झाली. बॅंकेने मार्च 2021 अखेर अनुत्पादित कर्जांमध्ये रू.94 कोटी तसेच राईट ऑफ केलेल्या कर्जामध्ये रू.91 कोटी अशी एकूण रू.185 कोटींची वसूली केली.
सभेमध्ये बॅंकेने शारदा सहकारी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मतदानासाठी सभेपुढे ठेवला. सदर ठराव 93 टक्के सभासद संख्येने आणि 99.63 टक्के शेअर्सच्या किमतीने मंजूर करण्यात आला. या प्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष ऍड. प्रल्हाद कोकरे, समूह अध्यक्ष. डॉ. मुकुंद अभ्यंकर, प्रभारी व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.