पुणे – कॉसमॉस को- ऑपरेटिव्ह बँकेस मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु. १५१ कोटींचा निव्वळ नफा तसेच रू. २१३ कोटी करपूर्व नफा झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली. बँकेच्या इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वोच्च निव्वळ नफा आहे. मार्च २०२३ अखेर बँकेने एकूण रू. ३०७०० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला असून यामध्ये रू. १७६०० हून अधिक ठेवी व रू. १३१०० हून अधिक कर्जवाटप केले आहे.
बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट रू. ५१४ कोटी असून ग्रॉस एनपीएचे प्रमाण ४.८०% तसेच नेट एनपीए १.७४% आहे. बँकेचा सीआरएआर १३.५४% आहे. मार्च २०२३ अखेर बँकेने व्यवसाय, ठेव संकलन, कर्जवाटप, कर्जवसुली, नेट व ग्रॉस प्रॉफिट या सर्व बाबतीत आतापर्यंतची सर्वात विक्रमी कामगिरी केली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले.
बँकेने अलिकडेच रिझर्व्ह बँकेकडे मुंबई येथील मराठा सहकारी बँक व दि साहेबराव देशमुख सहकारी बँक या दोन्ही बँकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवलेला आहे. सदर विलीनीकरण प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुंबई येथे बँकेचा मोठया प्रमाणावर विस्तार होणार असल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे यांनी दिली.