पुणे – कॉसमॉस बँकेने दि.३०डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये बेंगलुरू येथील नॅशनल को. ऑपरेटीव्ह बँक लि. या सहकारी बँकेच्या विलीनीकरणास सभासदांनी बहुमताने मंजूरी दिली. विद्यापीठ रस्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयात या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सभेत विलीनीकरणाबाबतची भूमिका विशद करताना बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले की, नुकत्याच कॉसमॉस बँकेने केलेल्या ३ बँकांच्या विलीनीकरणामुळे २६ शाखांचे विस्तारीकरण झाले आहे. तसेच बेंगलुरू स्थित या बँकेच्या विलीनीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने मान्यता दिल्यास, कॉसमॉस बँकेचा विस्तार कर्नाटक राज्यात मोठया प्रमाणात होणार आहे.
आपल्या भाषणात सीए काळे पुढे म्हणाले की, नॅशनल को. ऑपरेटीव्ह बँकेच्या एकूण १३ शाखा असून, १२ शाखा बेंगलुरूमध्ये व १ शाखा म्हैसूर येथे आहे. तसेच नॅशनल को. ऑपरेटीव्ह बँकेचा व्यवसाय रू. १५८६ कोटी इतका आहे. आत्तापर्यंत कॉसमॉस बँकेने १८ इतर लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.
बँकेतर्फे विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकरच रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. सदर सभेस बँकेचे उपाध्यक्ष प्रविणकुमार गांधी, संचालक मंडळातील सर्व सदस्य व व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.
नॅशनल को. ऑपरेटीव्ह बँकेच्या दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्या बँकेच्या ३१५२ उपस्थित सभासदांपैकी (९६.०९९४) ३०२९सभासदांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले. विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केलेल्या सभासदांच्या शेअर्सचे एकूण मूल्याचे प्रमाण ९७.६६% इतके आहे.
कॉसमॉस को. ऑपरेटीव्ह बँकेच्या दि.३० डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित सभासदांपैकी ९८.८५% सभासदांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले आहे. विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केलेल्या सभासदांच्या शेअर्सचे एकूण मूल्याचे प्रमाण ९९.९७% इतके आहे.
कॉसमॉस बँकेची भांडवल विषयक परिस्थिती कमालीची मजबूत आहे. त्यामुळे कॉसमॉस बँकेने अनेक बँकांना स्वतःत विलीन केले आहे. विलीन झालेल्या बँकांचे काम सुरळीत चालू असल्याचे सांगण्यात आले.