नगर -शहरात करोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अनेक भागात टप्प्याटप्प्याने कंन्टेन्मेंट झोन व बफर झोन वाढत आहेत. महापालिका कर्मचारी दैनंदिन कामकाजासाठी जीव धोक्यात घालून शहरातील स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य तसेच पाणीपुरवठ्याचे काम वेळोवेळी पार पाडत आहेत.
त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यांना सहकार्य करुन प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन नगरसेवक गणेश भोसले यांनी केले.
महापालिकेचे दैनंदिन कामकाज करणारे सर्व विभागातील कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन नगरसेवक भोसले यांनी सत्कार केला.
यावेळी ते बोलत होते. नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक संजय चोपडा, विभागप्रमुख नाना गोसावी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी मनपा विभागप्रमुख गोसावी म्हणाले की, करोनाच्या संकटकाळात मनपा कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. केलेल्या कामाचे कौतूक नगरसेवक गणेश भोसले यांनी करून, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. जेणे करून ते आपली जबाबदारी अधिक क्षमतेने पार पाडतील, असे त्यांनी म्हटले.