160 ऑक्‍सिजन बेड धूळखात पडून

मनपाच्या दळवी रुग्णालयातील सेंट्रल टॅंक यंत्रणा अडकली लालफितीत

पुणे – शहरात एका बाजूला करोनाग्रस्त रुग्णांना ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच महापालिकेच्या लालफितीच्या कारभारामुळे पालिकेच्या दळवी रुग्णालयात तब्बल 160 ऑक्‍सिजन बेडची सुविधा असून केवळ सेंट्रल टॅंकचे काम होत नसल्याने हे बेड वापराविना पडून आहेत. या ऑक्‍सिन बेडला ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारा सेंट्रल टॅंक आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करायचा की निविदा प्रक्रियेतून हे निश्‍चित होत नसल्याने जम्बो रुग्णालय उभारणीच्या गप्पा मारणाऱ्या पालिकेकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

महापालिकेच्या दळवी रुग्णालयात बांधकाम व्यावसायिकांची अग्रणी संस्था असलेल्या क्रेडाईकडून आयसीयू बेडसह, व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे कामही पूर्ण झालेले असून सुमारे 160 बेड तयार आहेत. मात्र, ऑक्‍सिजन यंत्रणेसाठी एका सेंट्रल टॅंकची आवश्‍यकता आहे. हा टॅंक महापालिका उभारणार होती. मात्र, आता बेड तयार झाले असले तरी हा टॅंक आयुक्तांच्या अधिकारात निविदा न काढता खरेदी करायचा का निविदा काढायची यावरून प्रशासनात एकमत नाही त्यामुळे हे काम रखडले आहे. ज्यावेळी ऑक्‍सिजन बेडची गरज आहे, अशाच वेळी हे बेड वापरता येत नसल्याचे समोर आले आहे.

‘आयसीयू’ सुरू…
दळवी रुग्णालयातील आयसीयू यंत्रणाही अशाच प्रकारे दुर्लक्ष केल्याने अनेक दिवस बंद होती. याबाबत प्रसिद्धी माध्यमातून माहिती समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने पाच आयसीयू बेड सुरू केले आहेत. त्यानंतर आता पुन्हा अशाच प्रकारे प्रशासकीय दिरंगाई होत असल्याने ऑक्‍सिजन बेड सुविधा पडून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.