पुणे – जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा घातक ठरली आहे. पहिल्या लाटेत सात महिन्यांत 8,818 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
तर दुसऱ्या लाटेत अवघ्या अडीच महिन्यांत तब्बल 6 हजार 488 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 61 ते 70 वयोगटातील व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाला. तर 31 ते 40 वयोगटातील तरुणांना सर्वाधिक लागण झाली आहे.
जिल्ह्यात करोनाची पहिली लाट ऑक्टोबर-2020 अखेरपर्यंत सुरू होती. नोव्हेंबरनंतर रुग्णसंख्या कमी झाली. जानेवारी-2021 मध्ये ही लाट आटोक्यात होती. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली.
तीन महिन्यांतच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. या लाटेत ऑक्सिजन आणि खाटांच्या कमतरतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला.
पहिल्या लाटेत वय वर्षे 31 ते 40 वयोगटातील बाधितांचा दर 24 टक्के होता. दुसऱ्या लाटेत तो 26 टक्क्यांवर पोहोचला. तर, पॉझिटिव्हिटी रेट (चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचा दर) होण्याचा आलेखही चढताच राहिला. पहिल्या लाटेत 19.4, तर दुसऱ्या लाटेत हा दर 23.6 टक्के राहिला आहे.
हॉटस्पॉट क्षेत्र वाढले
जिल्ह्यात पहिल्या लाटेत अनेक गावांनी करोनाला गावाच्या वेशीवरच थोपवले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत मोठ्या गावांसोबतच अनेक वाड्या-वस्त्यांवरही करोनाबाधित आढळू लागले आहेत. पहिल्या लाटेत जिल्ह्यात 205 हॉटस्पॉट होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या तब्बल 397 पर्यंत गेली आहे.