भाटघर -गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात घसरलेल्या दुधाच्या दरात मध्यंतरीच्या काळात वाढ झाली होती; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे गाईच्या दुधाचे दर प्रतिलिटर 9 रुपयांनी घसरले आहेत. दूध दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात शेतकरी शेतीबरोबरच आर्थिक आधार म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे; परंतु सद्यःस्थितीत दुधाचे दर लिटरमागे नऊ रुपयांनी घटले आहेत, तर पशुखाद्याचे दर वाढले आहेत. यामुळे पशुखाद्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.
अगोदरच करोनामुळे जीवन जगणे मुश्किल झाले असताना दुधाचे दरही आता कमी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून करोनाने थैमान घातले असल्याने, शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.
वर्षभरापासून शेतीमालाला पाहिजे तितका दर मिळत नाही. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. यातच आता दूध दर घटल्याने शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे,
दूध पावडर निर्मितीही थांबली
या वर्षी लॉकडाऊनच्या आधी गाईच्या दुधाला प्रतिलिटर 32 रुपये दर दिला जात होता. सद्यःस्थितीत हा दर 9 रुपयांनी घसरला असून, 23 रुपयांवर आला आहे. सरकारने कडक निर्बंध लागू केल्याने शहरातील दुधाची मागणी घटली आहे,
तसेच ग्रामीण भागात असलेल्या हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आणि दूध पावडर निर्मिती बंद असल्याने याचा परिणाम दूध दरावर झाला आहे.
पशुखाद्याची 50 किलोची पिशवी 1400 रुपये
ग्रामीण भागात शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसायाकडे पाहिले जाते. यात पोल्ट्रीपेक्षा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
त्यासाठी जनावरांना हिरवा चारा, पशुखाद्याची आवश्यकता असते. भुसा व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत. पशुखाद्याची 50 किलोची पिशवी 1300 ते 1400 रुपये झाली आहे. दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत.
सध्या गाईच्या दुधाचे दर 9रुपयांनी घसरले असून पशुखाद्याचा खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
– विश्वास गाढवे, संगमेश्वर दूध संकलन केंद्र, संगमनेर