नाशिकमध्ये आढळला आणखी एक संशयित रुग्ण
नाशिक – भारतात करोनाव्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता राज्यालाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही करोना व्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. हा संशयित रुग्ण मंगळवारी नाशिकमध्ये आढळून आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच आज पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नाशिकमधील या तरुणामध्ये करोना व्हायरसची लक्षणे आढळली. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी आदी लक्षणं त्याच्यात आढळल्याने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर या रुग्णाला करोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचे रक्ताचे नमूने घेण्यात आले असून पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याला करोनाची लागण झाली की नाही, याची माहिती मिळणार आहे.
दरम्यान, नवी दिल्ली आणि तेलंगणामध्ये सोमवारी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर जयपूरमध्येही एका व्यक्तीचा करोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.