नगर – शहरातील एका 70 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेला सारीसदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ऑरेंजकडून ग्रीनकडे वाटचाल सुरू असलेल्या नगर जिल्ह्याला पुन्हा रेड सिग्नल मिळतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 54 झाला आहे. नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरातील सुभेदारगल्ली भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तत्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या असून, झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्लीच्या मध्यभागापासून दोन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्यादृष्टीने मंगळवारी सकाळीच तयारी सुरू केली होती. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेचे देशपांडे रुग्णालय आणि बीएसएनएल ऑफिस हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या वतीने करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 57 जणांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
“सारी’ या आजाराची लक्षणे
शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारगल्ली येथील महिलेला सर्दी, खोकला, ताप आदीचा त्रास होत होता. म्हणून ही महिला स्वत:हून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. “सारी’ या आजाराची लक्षणे आढळून आल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
खासगी डॉक्टरकडे उपचार
महिलेची विचारपूस केली असता, ती एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. या डॉक्टरसह या भागातील 56 जण महिलेच्या संपर्कात आले आहेत. संपर्कातील संशयीतांना बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे या रुग्णांची तपासणी सुरू आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करायचे की घरी सोडायचे, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.