शिरूर -शिरूर शहरातील व आसपासच्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत उपचार मिळावे, यासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे तीस बेडचे अद्ययावत रुग्णालय सुरू होत आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय त्याबरोबर स्थानिक नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली. शहरात करोनाकरिता तातडीची टेस्ट सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व अधिकाऱ्यांचे उपस्थित नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार अशोक पवार यांनी शिरूर शहरात 30 बेडचे कोविड उपचार सेंटर उभे करण्याची सूचना केली होती.
त्याप्रमाणे शहरात शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे 30 बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू होण्यासाठी सर्व उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या. याठिकाणी आणि सर्व 30 बेडला ऑक्सिजन सुविधा, तसेच काही व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात येणार आहे. डॉक्टरांसह अद्ययावत स्टाफ याठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार करणार आहे.
करोना तपासणी ते उपचार तसेच त्यांना जेवणाची सोय हे सर्व शासनामार्फत मोफत होणार आहे. खासगी हॉस्पिटलचे दर रुग्णांना परवडत नसून त्यासाठी शिरूर शहरात हे हॉस्पिटल सुरू करण्यात येत असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. पाच ते सहा दिवसांत उपचार केंद्र सुरू होणार आहे. याठिकाणी कोविड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार असून त्याचा अहवाल अर्ध्या तासात येणार आहे, असे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.