चीनचा आधार घेऊन पाकिस्तानने केलेला प्रयत्न अयशस्वी

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद बैठकीत पुन्हा पडले तोंडघशी

संयुक्त राष्ट्रे – पाकिस्तानने चीनचा आधार घेऊन काश्‍मीर मुद्‌द्‌याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यासाठी चीनच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यात आली. मात्र, त्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्याने पाकिस्तान आणि चीन पुन्हा तोंडघशी पडले.

पाकिस्तान आणि चीनची पुन्हा फटफजिती झाल्याची माहिती भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी टी.एस.तिरूमुर्ती यांनी दिली. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत काश्‍मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय विषय असल्याचे अनेक सदस्य देशांनी अधोरेखित केले.

ती भूमिका मांडण्यात अमेरिकेने पुढाकार घेतला. काश्‍मीर मुद्दा हा सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचा विषय नाही, असे त्या देशांनी नमूद केले. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुहाकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.

भारताने मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे काश्‍मीरवर वक्रदृष्टी असणाऱ्या पाकिस्तानच्या पोटदुखीत वाढ झाली. त्यातून तो देश सातत्याने काश्‍मीर मुद्‌द्‌याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र, जम्मू-काश्‍मीरबाबतचा निर्णय आमची अंतर्गत बाब असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला ठामपणे सांगितले आहे. भारताची ती रास्त भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य असल्याचे वारंवार सूचित झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.