जुलै आणि ऑगस्टपेक्षा सर्वाधिक रुग्णसंख्या : शहर, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा चिंतेत
पुणे – जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाबाधित संख्येने माजविलेला कहर सप्टेंबर महिन्यात कमी होईल, असे वाटत होते. मात्र, या दोन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये करोनाचा कहर आणखीच वाढला. करोना संसर्ग “अनलॉक’मुळे झपाट्याने वाढला. सप्टेंबर महिन्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 13 हजार 707 बाधित सापडले. तर 2 हजार 394 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहर जिल्ह्यात सर्वाधिक संसर्गाची तीव्रता जुलै महिन्यानंतर दिसून आली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात करोनाच्या साथीचा कहर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाला. जुलैच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण ऑगस्ट महिन्यात 85 हजार 192 आढळून आले यामध्ये शहरात 41 हजार 98 तर तर जिल्ह्यात या महिन्यात कमी रुग्ण आढळले तरी याच महिन्यात एकूण 2 हजार 52 जणांना जीव गमवावा लागला.
सप्टेंबर महिन्यात एका महिन्यात 1 लाख 13 हजार 707 जणांना करोनाची बाधा झाली. यात पुण्यात सर्वाधिक 49 हजार 918 अर्थात 50 हजारांपर्यंत रुग्णसंख्या आढळली. तर पिंपरी चिचंवडमध्ये सप्टेंबर महिन्यात 28 हजार 751 रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 35 हजार 38 जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात संसर्ग झाल्याचेही आढळून आले आहे. एकूणच, गेल्या चार ते पाच महिन्यांच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.