पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. एकाच दिवशी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील दोन व शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील मृतांची एकूण संख्या 24 झाली आहे. “करोना’ने मृत्यू होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे.
तीन दिवसांपूर्वीच शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा पाचशेच्या पुढे गेला होता. आकडा वाढत असला तरी मृत्युचे प्रमाण अत्यल्प असल्याने काहीसा दिलासा मिळत होता. परंतु एकाच दिवशी झालेल्या चार मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत शहरात 260 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहरातील 10 रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 14 जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.
12 एप्रिल रोजी थेरगाव येथील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुणे येथील रहिवाशी असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुषाचा, 29 एप्रिल रोजी खडकी येथील एका महिलेचा, 6 मे रोजी शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला.
तसेच 10 मे रोजी भोसरी येथील एका रुग्णाचा, 11 मे रोजी पुणे येथील पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 15 मे रोजी तब्बल तिघांचा मृत्यू झाला. तर 19 मे रोजी भोसरीतील एका महिलेचा व एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 24 मे रोजी पुणे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. 29 मे रोजी सांगवी व जुन्नर येथील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज मंगळवारी (दि. 2) शहरातील 2 व शहराबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा मृत्यू झाला.