लोणंद – लोणंदजवळ असलेल्या तरडगावात, तांबवे येथे यापूर्वीच करोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले असून लोणंद मात्र अजूनही करोनाला थोपवण्यात यशस्वी झाले होते. मात्र, लोणंद येथील एका लहान मुलीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोणंदमध्येही करोनाची एंन्ट्री झाली आहे.
लोणंद शहरालगत असलेल्या नागरी वसाहतीतील एका कुटुंबाचे तांबवे येथील बाधित रूग्णाशी निकटचे संबंध आलेले होते. त्यापैकी एका लहान मुलीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोणंदमधे खळबळ उडाली. रूग्ण आढळल्याने कंटनमेंट झोनमधे लोणंद येत असल्यामुळे तातडीने लोणंदच्या सीमा सील करण्यात येऊन खबरदारीचा उपाय म्हणून लोणंदमधील सर्व प्रकारची दुकाने तात्काळ बंद करण्यात आली आहेत. तसेच या रूग्णाच्या संपर्कात असलेले 13 हाय रिक्स व 20 लो रिक्स आढळून आले आहेत. त्यातील 13 हाय रिस्क पैकी 5 शिरवळ व 8 फलटणला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. तसेच रूग्ण सापडला असलेली इमारत सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करून निर्जंतुक करण्यात आली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली.
शहरात आरोग्य सर्वेक्षणासाठी 88 आरोग्य तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचारिका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सर्वेक्षणासाठी कार्यरत करण्यात येणार आहेत.लोणंदमध्ये करोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला असल्यामुळे लोणंदच्या सीमा सील करण्यात आल्या असून लोणंद शहर आणि गोळेगाव यांचा समावेश कंटेनमेंट झोनमधे करण्यात आला आहे. तर लोणंदनजीक असलेल्या पाडेगाव (ता. खंडाळा), पाडेगाव (ता. फलटण), मरिआईचीवाडी, बाळुपाटलाचीवाडी, बावकलवाडी, पिंपरे बु, खेड बु, कापडगाव, तांबवे, तरडगाव, कोरेगाव या गावांचा बफर झोनमधे समावेश करण्यात आला आहे.