करोनामुळे कर्मचारी उपस्थितीवर परिणाम : शिक्षक, कर्मचारी हवालदिल
पुणे – महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात करोना प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागातील तसेच इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्के करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन नियमित कामे खोळंबली आहेत. कामे जलद गतीने मार्गी लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबतीत योग्य ते आदेश शिक्षण विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासनाने लॉकडाऊन करुन निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने सुरू आहे. मात्र, याचा विविध कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब उघड होऊ लागली आहे. मासिक पगार पत्रके, सेवानिवृत्तीची पेन्शन प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, वैद्यकीय परिपूर्तीची बिले, सेवा खंड क्षमापन, विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रस्ताव, मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या मान्यताचे प्रस्ताव तसेच इतर कामे घेऊन शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक कर्मचारी शिक्षण विभागातील कार्यालयात जातात. मात्र तेंव्हा संबंधित टेबलाचा कार्यासीन अधिकारी आलेले नाहीत असे सांगितले जाते.
सहा महिने ते एक वर्ष होऊन देखील पेन्शन प्रकरणे व मुख्याध्यापक मान्यता प्रलंबित आहे. त्यामुळे संस्था, मुख्याध्यापक व इतर कर्मचारी त्रस्त होऊन आले पाहिजे या हेतूने सदर कामांना भ्रष्टाचाराला मोठे प्रोत्साहन मिळत आहे. नियमित निरनिराळ्या कामासाठी दलालांचे जाळे कार्यालयामध्ये निर्माण झालेले असून त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
त्यासाठी प्रत्येक कार्यालयामार्फत जॉबचार्ट जाहीर करावा व कर्मचारी उपस्थिती बाबतचे वेळापत्रक जाहीर करावे. ऑनलाइन यंत्रणा, व्हॉट्स ऍप व ई-मेल, दूरध्वनीचा उपयोग कार्यालयीन कामकाजासाठी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, कार्याध्यक्ष नागो गाणार ,राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, कार्यालयीन मंत्री सुनील पंडित, शिक्षक संदेश प्रमुख उल्हास वडोदकर, निरंजन गिरी आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.