ग्रामीण भागात करोना बाधितांची रुग्णवाहिकेसाठी लूट

खासगी रुग्णवाहिका चालकांवर चाप लावण्याची मागणी

मांडवगण फराटा  -शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी मांडवगण फराटा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु येथील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना इतर ठिकाणी तपासणीसाठी जाण्यासाठी अथवा घरातून कोविड सेंटरला येण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मांडवगण फराटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या पुढाकाराने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यासाठी मंगल कार्यालयाचे मालक संभाजी फराटे यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी समाजातील दानशूर व्यक्‍तींना मदतीचे आवाहन केले होते.

त्यामुळे येथे समाजाकडून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात येत आहे. चांगल्या सुविधा मिळत असल्याने परिसरातील रुग्ण येथेच उपचार घेत आहेत. परंतु करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना ये-जा करण्यासाठी येथे स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध नाही. परिणामी या भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे.

करोनाबाधित रुग्णांना तपासणीसाठी अथवा इतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागले तर येथे रुग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेर गावातील रुग्णवाहिका बोलवाव्या लागत आहे. मांडवगण फराटा कोविड केअर सेंटरला एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे परंतु ही रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून बंद होती.

त्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्यामुळे ही रुग्णवाहिका लांब अंतरावर रुग्णांची ने-आण करु शकत नाही. तसेच या रुग्णवाहिकेच्या चालकलाच करोनाचा संसर्ग झाल्याने त्यानेही काम सोडलेले आहे. करोना रुग्णांना या सर्व अडचणींमुळे खासगी गाडीचाच आधार घ्यावा लागत आहे. म्हणून या भागातील करोना रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.