पुणे : विमान प्रवासामध्ये उलटी झाली म्हणून, त्या चीनी प्रवाशाला शुक्रवारी सकाळी पुण्याच्या नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. आज दुपारी त्या प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. तसेच अन्य दोघा संशयीत व्यक्तीचे नमुनेही निगेटीव्ह आल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
चीनमध्ये कोरोना विषाणूने हौदोस घातला असून, या विषाणूचा शिरकाव आपल्या देशात होवू नये यासाठी भारतासह अन्य देशांकडून विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. भारतात 21 विमानतळाहून अधिक ठिकाणी ही तपासणी होत आहे. शुक्रवारी सकाळी इअर इंडियाचे विमान (एआय 852) दिल्लीहून पुण्याला येत होते. त्या विमानामध्ये एका चीनी व्यक्तीला उलटी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. विमान पुण्यात उतरताच त्या चीनी व्यक्तीला तातडीने नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.
दरम्यान, ही माहिती सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या त्या चीनी व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. खबरदारी म्हणून सर्व नमुने तपासणी पाठविले होते.
त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आतापर्यंत 12 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. त्यातील 9 जणांचे नमुने निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडले आहे. तर चीनी व्यक्तीसह अन्य दोघांचे नमुने आज निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना काही दिवसातच घरी सोडण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.