CoronaFight : हैदराबादेत सिंहांना करोनाचा संसर्ग

नवी दिल्ली – हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील आठ आशियाई सिंहांना करोनाची बाधा झाली आहे. 380 एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयातील या सिंहांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यांना करोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती.

या सर्व सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांची वर्तणूक आणि खाणे सामान्य पद्धतीने होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले असून दर्शकांसाठी प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले आहे, असे वन मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची चाचणी घेण्याची पद्धत आम्ही विकसित करत आहोत. कारण प्रत्येक वेळी वन्यप्राण्यांची लाळ गोळा करणे शक्‍य नसते. या प्राणिसंग्रहालयात सापडलेल्या सिंहाच्या लाळेत करोनाचा कोणताही नवा व्हायरंट सापडला नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. मानवाप्रमाणेच तेही सस्तन प्राणी असल्याने त्यांना या विषाणूची बाधा झाली असावी, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

प्राणिसंग्रहालायातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना या संसर्गाची बाधा झाली असावी. या प्राण्यांच्या लाळेचे नमुने आम्ही वेळोवेळी तपासणीसाठी पाठवत आहोत, असे प्राणिसंग्रहालयाच्या वरिष्ठांनी सांगितले. ते म्हणाले, या प्राण्यांना तापासारखी लक्षणे दिसल्याने त्यांना स्कीझ केज पद्धतीने लाळ घेण्यात आली. यात एका पिंजऱ्यात प्राण्यांना बंद करण्यात येते. त्यामुळे ते हलू शकत नाहीत किंवा निमुने घेताना विरोध करू शकत नाहीत.

मानवाला धोका नाही
जगभरातील अन्य प्राणिसंग्रहालयात सार्स कोव्ह – 2 (करोना) संसर्गाच्या अनुभवावर आधारित हे प्राणी मानवाला करोनाचा संसर्ग करू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या आशियाई सिंहाच्या लाळेचा नमुना काळजीपूर्वक तपासण्यात आला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ते एकमेकाजवळ राहात असल्याने त्यांच्यात तो पसरला असावा, असे सेंटर ऑफ सेल्यलर अँड मोलेक्‍युलर बायोलॉजीचे राकेश मिश्रा यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.