वॉशिंग्टन – अमेरिकेत आता 12 ते 15 या वयोगटाचे लसीकरण होण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात या वयोगटासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बहुतांशी मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे.
अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायझरने ही लस विकसित केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस फायझरने या वयोगटातील 2260 स्वयंसेवकांची चाचणी घेतली होती. या चाचणीत लस घेतलेल्या मुलांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर प्रौढांसारखेच दुष्परिणाम जाणवू लागले होते. यामध्ये थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे आदी लक्षणे जाणवली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर किमान दोन वर्षे देखरेख ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लशीमुळे मिळालेली सुरक्षितता किती दीर्घकालीन आहे, याचा अभ्यास करता येईल.
फायझरशिवाय मॉडर्नानेही अल्पवयीनांसाठी लस विकसित केली आहे. मॉडर्नाने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. येत्या काही महिन्यांत या चाचणीचे निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे.