करोना काळ’वर्ष’: आरोग्य व्यवस्थेलाच ‘ऑक्‍सिजन’

करोना काळात उभारली सक्षम यंत्रणा; ऑक्‍सिजन बेड्‌स 6 वरून 650


डॉक्‍टरांची तब्बल 151 पदे भरली; तब्बल 70 ते 80 व्हेंटिलेटर सज्ज

पुणे – करोनामुळे पहिल्यांदाच शहराच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. दरवर्षी जवळपास 300 ते 400 कोटींचा निधी खर्चूनही महापालिकेची आरोग्य व्यवस्था मरणासन्न अवस्थेत होती. तब्बल 45 लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ 6 ऑक्‍सिजन बेड्‌सची सुविधा होती, तर पालिकेच्या एकाही रुग्णालयात आयसीयूची सुविधा नव्हती. हे कमी म्हणून काय, आरोग्य विभागाची तब्बल 50 टक्केहून अधिक पदेही रिकामी असल्याने डॉक्‍टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी होती. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये केवळ आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिक उपचारासाठी जात होते. मात्र, करोनामुळे या मरणासन्न आरोग्य व्यवस्थेला चांगलाच “ऑक्‍सिजन’ मिळाला आहे.

मागील वर्षभरात महापालिकेने बाणेर येथे स्वत:चे हॉस्पिटल उभारले असून, तेथे तब्बल 320 ऑक्‍सिजन बेड्‌सची सुविधा आहे, दळवी हॉस्पिटलमध्ये 200 ऑक्‍सिजन बेड्‌स, डॉ. नायडू रूग्णालयात 150 ऑक्‍सिजन बेड महापालिकेने कायमस्वरूपी उभारले आहेत. तर, करोना येण्यापूर्वी महापालिकेकडे केवळ 5 व्हेंटिलेटर होते. मात्र, आयसीयूची सुविधा नसल्याने ते पॅकबंदच होते. मात्र, करोना काळात सीएसआर, केंद्र-राज्यशासनाकडून मदत तसेच महापालिकेनेही खरेदी केल्याने स्वत:चे तब्बल 70 ते 80 व्हेंटिलेटर सज्ज आहेत.

त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे करोनाच्या निमित्ताने महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीही उपलब्ध झाली आहे. या आजारापूर्वी आरोग्य विभागाकडे मंजूर पदांपैकी वैद्यकीय तज्ज्ञांची जवळपास 151 पदे रिक्त होती. ही पदेही करोनाच्या काळात प्राधान्याने भरली असून, याच कालावधीत शहराच्या सार्वजनिक आरोग्याची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत महापालिकेस प्रत्येक वर्षी नवीन 100 डॉक्‍टर मिळतील.

करोना काळात महापालिकेकडून आरोग्य व्यवस्था सक्षम करणाऱ्यावर भर देण्यात आला. त्याचा उपयोग करोना नियंत्रणासह, भविष्यातही होणार आहे. तर आता महापालिकेकडे सुमारे 650 ऑक्‍सिजन बेड्‌स असून 70 ते 80 व्हेंटिलेटर आहेत. तर आता आवश्‍यक डॉक्‍टर्सही असून पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालयही या वर्षीपासून सुरू होत आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.