कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला

मुंबई: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 177 प्रवासी बाधित भागातून आले असून त्यांचा 14 दिवसांपर्यंतचा पाठपुरावा सुरु आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३० हजार ४४२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १७७ प्रवासी आले आहेत त्यापैकी १०४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

दि. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४३ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ४२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. आजवर भरती झालेल्या ४३ प्रवाशांपैकी ४२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १ जण नायडू रुग्णालय, पुणे येथे भरती आहे.

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला

दि.६ फेब्रुवारी रोजी पुणे येथील नायडू रुग्णालयात एका चिनी प्रवाशाला विमानात उलटी झाली म्हणून भरती करण्यात आले होते. त्याचा प्रयोगशाळा नमुना निगेटिव्ह आला. परंतु १४ दिवस विलगीकरण आवश्यक असल्याने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत नायडू रुग्णालयात भरती ठेवण्यात आले होते. ११ तारखेला या रुग्णालयातून डिस्चार्ज होताना हा ३१ वर्षीय तरुण अत्यंत भावूक झाला होता. “अचानक मला इथे भरती व्हावे लागले, भाषेचा प्रश्न होता. पण इथल्या डॉक्टर्स आणि नर्सेसनी मला खूप चांगली वागणूक दिली. जेवण, स्वच्छता, उपचार, नर्सिंग काळजी इतकी उत्तम होती की, मी विलगीकरण कक्षात भरती आहे, असे मला वाटलेच नाही.” असा अभिप्राय या अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या तरुणाने नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.