बाधितांची संख्याही पोहचली 14 हजारावर
वॉशिंग्टन- अमेरिकेत करोना बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून या विषाणुंमुळे मरण पावलेल्यांची संख्या तेथे 218 इतकी झाली असून एकूण बाधितांची संख्या 14 हजार 299 इतकी झाली आहे.त्यामुळे अमेरिका हा करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला जगातील सहावा देश ठरला आहे. त्या देशातील कॅलिफोर्निया प्रांतात गव्हर्नरांनी नागरीकांसाठी पुर्ण संचारबंदी जाहीर केली आहे. अन्यही प्रांतात अभुतपुर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
करोनो बाधित देशांच्या यादीत चीन पहिल्या स्थानावर असून तेथील मृतांची आत्तापर्यंतची संख्या 3248 इतकी असून बाधितांची संख्या 80697 इतकी आहे. दुसऱ्या स्थानावर इटाली हा देश असून तेथे मृतांची संख्या 3405 व बाधितांची संख्या 41035 इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इराण मध्ये आत्ता पर्यंत 1284 बळी गेले आहेत. स्पेन मध्ये 831 बळी गेले असून जर्मनीत 44 बळी गेले आहेत. फ्रांसमधील बळींची संख्या 372 इतकी आहे.
अमेरिकेतही हा विषाणु झपाट्याने सर्वत्र पसरला असून त्या देशातील सर्व 50 प्रांतात करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बहुतेक सारी अमेरिका आता लॉकडाऊनच्या स्थितीत गेली आहे. लोकांना केवळ वैद्यकीय आणिबाणी असेल किंवा औषधे आणि अन्न खरेदी करायचे असेल तरच बाहेर पडू दिले जात आहे. ही अभुतपुर्व परिस्थिती असून त्यामुळे उद्योग व्यवसायांनाही आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. सन 2008 पेक्षाही भीषण मंदीची स्थिती त्या देशाला सध्या भेडसाऊ लागली आहे.