ढाका – बांगलादेशात करोनाविरोधी लसीकरण कार्यक्रमाची सुरूवात रविवारी ढाका येथे झाली. लसीकरण कार्यक्रम संपूर्ण वर्ष सुरू राहील, असे ढाका येथील नॅशनल शेख रसेल गॅस्ट्रॉलिव्हर रुग्णालयात कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आरोग्यमंत्री जाहिद मालेक म्हणाले.
ही लस सुरक्षित असून लसीवरील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी मंत्री व इतर मान्यवर ही लस घेत आहेत. तसेच लस अत्यंत सुरक्षित असल्याने लोकांना कोणत्याही अफवा ऐकू नयेत, असेही मालेक यांनी सांगितले.
ढाका येथे रविवारी सुप्रीम कोर्टाच्या काही न्यायाधीशांनीही लस घेतली. देशभरात लसीकरण कार्यक्रमासाठी 3.25 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीकरण कार्यक्रम संपूर्ण बांगलादेशातील एक हजाराहून अधिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आला आहे. ढाका आणि देशाच्या इतर भागात लसीकरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांचे 2400 हून अधिक संच कार्यरत आहेत.
बांगलादेश सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ऍस्ट्रॅझेनेका लसीचे 3 कोटी डोस खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यापैकी 50 लाख डोस मागील महिन्यात बांगलादेशात दाखल झाले. भारताने लसीचे 20 लाख डोस बांगलादेशला भेट म्हणून दिले आहेत.