नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी एकाच दिवसांत दिल्लीत 823 नवे बाधित सापडले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या हजाराच्या जवळपास पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांत करोनाचे नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले असताना गेल्या पंधरा दिवसांत करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
केवळ 15 मार्च ते 21 मार्च या सहा दिवसांत नवे साडेचार हजार रूग्ण सापडले आहेत. यात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकीकडे रूग्णसंख्या वाढत असताना दिल्लीकर जो बिनधास्तपणा दाखवत आहेत, त्यावरून त्यांना आता करोनाचे भयच राहीले नसल्याचे दिसून येते आहे. बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होते आहे.
सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे आणि मास्क घालण्याचीही तसदी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे. केवळ मार्च महिन्याची आकडेवारी सांगायची झाली तर दिल्लीत आतापर्यंत नवे साडेआठ हजार पॉझिटिव्ह सापडले आहेत. याचा अर्थ दिवसाला सरासरी 400 नव्या रूग्णांची भर पडते आहे.