पुणे -प्रेम व्यक्त करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या “व्हॅलेन्टाईन डे’ला वेगळेच वलय असते. विशेषत: तरूणाईकडून उत्साहात “व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात येतो. यादिवशी गिफ्ट देण्यासाठी बाजारपेठा आठवडाभर आधीच सज्ज असतात. मात्र यंदा “व्हॅलेन्टाईन डे’च्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये फारशी गर्दी नव्हती.
14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यात येतो. यादिवशी विशेषत: प्रेमी तरूणाई, पती-पत्नी एकमेकांना गिफ्ट देत व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करतात. फेब्रुवारी महिना सुरू होताच “व्हॅलेन्टाईन वीक’ची सुरूवात होते. पाहता पाहता दुकाने, मॉल्स, हॉटेल्समध्ये “व्हॅलेन्टाईन डे’निमित्त विशेष सजावट देखील केली जाते.
मात्र यावर्षी करोनामुळे अनेक जण गावी आहेत, तर महाविद्यालये देखील बंद असल्याचा त्याचा परिणाम सेलिब्रेशनवर होत असल्याची चर्चा रंगत आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या शहरांत विविध गिफ्ट शॉपी, मॉल्स भेट वस्तुंनी सजले आहेत.
गुलाबासह ग्रीटींग कार्ड, कीचेन्स, चॉकलेट, फोटो फ्रेम, ज्वेलरी आदी वस्तुंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यासह यंदा “व्हॅलेन्टाईन डे’ रविवारी असल्याने सेलिब्रेशनची तरूणाईमध्ये चांगलीच चर्चा रंगत होती. मात्र यावर्षी बाजारपेठा सजल्या तरी ग्राहक कमी आहेत.