पुण्यात करोना रिकव्हरी वेगाने, आता फक्त ‘इतके’ टक्के सक्रिय बाधित

पुण्यात करोना रुग्ण दुपटीचा वेग 40.11 दिवस इतका

पुणे – करोना बधितांची संख्या वाढत असली तरी, त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांहून अधिक आहे. शहरातील 87 हजार 317 बाधितांपैकी 70 हजार 269 रुग्ण बरे झाले आहेत. करोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 80.48 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एकूण बाधितांमधील 17.11 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे हे चित्र काहीसे दिलासादायक आहे.

शहरात जूनपासून लॉकडाऊन शिथिलतेनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे प्रशासनाने 14 जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या वेळी शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 57, सक्रिय बाधितांची संख्या 39, तर मृत्यूदरही 4 टक्के होता. परंतु मागील पंधरा दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा तपासण्यांच्या तुलनेत घटण्याला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

शहरात आतापर्यंत 4 लाख 20 हजार 458 करोना चाचण्या झाल्या आहेत. हे प्रमाणही देश आणि राज्यातील चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे 94 हजार 935 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 20.77 टक्के आहे. तर, मृत्यूदरही 2.41 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.

शहरात एकूण 87 हजार 317 जणांना करोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी तब्बल 70 हजार 269 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 हजार 108 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण 2.41 टक्के आहे. शहरात सध्या 14 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता 17.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सक्रिय रुग्णांपैकी 7 हजार 946 रुग्ण घरीच राहून होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत तर उर्वरित 6 हजार 994 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहरातील करोना रुग्ण दुपटीचा वेग 40.11 दिवस इतका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.