पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गंभीर आरोप

सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणानेच रॅंकिंग घसरले : खासदार ऍड. वंदना चव्हाण

पुणे : स्मार्ट सिटीचे रॅंकिंग घसरण्यात पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचा आरोप खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता 28 व्या क्रमांकावर गेल्याने आश्चर्याचा धक्का बसला. केंद्रात, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमधून उघड झाले आहे. या वस्तुस्थितीला केवळ प्रशासनच नव्हे तर, सत्ताधारी म्हणून भाजपचे सपशेल अपयश आहे, असा आरोपही खासदार चव्हाण यांनी केला.

महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तम कामांमुळे लाइट हाऊस, स्मार्ट क्लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रीट, ई- बस खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरूवात झाल्याचा दावा खासदार चव्हाण यांनी केला आहे. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले.

गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोहोचवता आल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळाला नाही.

परिणामी, पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदा आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या या उदाहरणातून अधोरेखित झाल्याची टीकाही खासदार चव्हाण यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.