न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन या दोन दिवसानंतर भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्यासंबंधी सध्या एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल बायडेन यांच्या कार्यालयाकडून याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
जिल बायडेन यांच्या कार्यालयाने या संबंधी माहिती देताना, “जिल बायडेन यांच्यात करोनाची काहीही लक्षणं नाहीत. त्या आता डेलावेयर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानीच राहणार आहेत” असे म्हटले आहे. त्यासोबतच व्हाईट हाऊसच्या मेडिकल युनिटने त्यांच्या निकटवर्तीयांना लेडी जिल बायडेन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळवलं आहे.
७१ वर्षीय जिल बायडेन १६ ऑगस्टला साऊथ कॅरोलिना या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासह राष्ट्रपती जो बायडेनही होते. तिथे त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि जिल बायडेन या पाच दिवस क्वारंटाईन राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबरला म्हणजे दोनच दिवसांनी भारतात येणार होते. मात्र त्याआधीच ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या भारत दौऱ्यासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.