पिंपरी – पिंपरी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची दिव्याची गाडी आली… गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले… त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला… मुख्य प्रवेशद्वार तसेच आयुक्त कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्युट केले… हे दृश्य होते महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचे…
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने सोमवार (दि.4) एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणी नगर प्राथमिक शाळेतील इयत्ता 7 वी मधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडी येथील दत्तोबा रामचंद्र काळे शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका केली.
यावेळी त्यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक देखील घेऊन सूचना केल्या. बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये जावून शिक्षकाची भूमिका पार पाडली. इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत शिकवत असताना चांद्रयानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.