करोनामुळे पालिकेला तीनशे कोटींचा फटका

  • उत्पन्नात घट; लॉकडाऊनमुळे अर्थिक घडी विस्कटली

पिंपरी – मागील वर्षी करोना संक्रमणामुळे शहरामध्ये मार्च ते मे दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर काही निर्बंध शिथील केले तरी अनेक कठोर नियम शहरवासियांवर होते. या लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची अर्थिक घडी विस्कटली आहे. महापालिकेला 2020-21 या अर्थिक वर्षात मोठा आर्थिक फटका बसला आहे. वर्षभरात मिळकत कर, बांधकाम परवाना, एलबीटी, जीएसटी, पाणीपट्टी या विभागातून मिळणारे उत्पन्न सुमारे 300 कोटींनी घटले आहे. महापालिका तिजोरीत वर्षाअखेरीस 2 हजार 846 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

महापालिकेला 2019-20 या आर्थिक वर्षात जीएसटी, एलबीटीतून 1709 कोटी 76 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यामध्ये 13 कोटी 72 लाखांनी घट झाली असून 1696 कोटी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मिळकत करात 175 कोटींची वाढ झाली असून या वर्षाअखेरीस 577 कोटींचे उत्पन्न मिळाले. महापालिकेच्या विविध ठेवींवरील व्याजातून 140 कोटी 48 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षात व्याजापोटी 291 कोटी 81 लाखाचे उत्पन्न मिळाले होते.

बांधकाम परवानगी विभागातून 2019-20 या आर्थिक वर्षात 586 कोटी 53 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये घट झाली असून 380 कोटी 47 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. भांडवली जमेतून 49 कोटी 5 लाख, पाणीपट्टीतून 44 कोटी 15 लाख, भूमी आणि जिंदगी विभागातून 3 कोटी 29 लाख, आकाश चिन्ह परवाना विभागातून 4 कोटी 20 लाख असे एकूण इतर विभागातून 87 कोटी 75 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. सर्व विभागांमधून महापालिकेच्या तिजोरीत 2020-21 या आर्थिक वर्षात 2 हजार 846 कोटींचा महसूल जमा झाला आहे. 2019-20 आर्थिक वर्षात 3153 कोटी 8 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यातुलनेत यंदा 307 कोटी 8 लाखांनी उत्पन्न घटले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुन्हा लॉकडाऊन झाल्यास मोठा फटका
शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा करोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दरदिवशी सरासरी 3 हजारांपर्यंत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरावर कडक लॉकडाऊनची टांगती तलवार कायम आहे. सद्यस्थितीत शहरात मिनी लॉकडाऊन म्हणजेच रात्रीची संचारबंदी व काही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पूर्ण लॉकडाऊन झाला तर शहरातील उद्योग-धंदे संकटात सापडणार आहेत. त्यासोबतच नागरिकांची अर्थिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम कर आकारणीवर होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला बांधकाम परवानगी विभागातून सर्वाधिक महसूल मिळतो. शहरात लॉकडाऊन लागला तर बांधकाम व्यावसायिक तोट्यात जाणार आहे. त्याचा परिणाम महसूलावर होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.