मोठा निर्णय ! दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार महिला आयपीएस अधिकारी

मुंबई – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये दीपाली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांनी यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. तसेच विविध संघटनांनी या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला यश आलं आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या महिला डीवायएसपी अधिकारी पूनम पाटील करत आहेत. पण या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिका-यांकडून व्हावी, अशी मागणी भाजप आणि वन कर्मचारी तसेच अधिकारी संघटनेने केली होती. त्यानंतर राज्य शासनाने हा तपास आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे दिला आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी पूनम पाटील करत आहेत.  या प्रकरणाचा वेगळा तपास करण्यासाठी शासनाने आयपीएस प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही तपास आपापल्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तत्पूर्वी या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्याचा आणि तो खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.