अन्य आजार असलेल्या रुग्णाचा वेळेवर उपचारांअभावी मृत्यू
– अमोल साबळे
कर्वेनगर – डोक्यात बेरोजगारीचे टेंशन, वडिलांच्या आजारपणाचा खर्च, करोनामुळे उत्पन्नाचं साधन नाही. यामुळे खचलेल्या एका तरुणाला हृदयविकाराचा त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रुग्णालय प्रशासनाने करोना व अनामत रकमेच्या नावाखाली उपचारासाठी उशीर केल्याने तरुणाला प्राण गमवावे लागले. करोना काळात इतर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेताना रुग्णालय प्रशासन उशीर करीत आहे, अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत याकरिता शासकीय पातळीवर योग्य नियमावली तयार होणे गरजेचे ठरत आहे.
कर्वेनगर परिसरात राहणारा हा तरुण घरात कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने वारजे येथील खासगी रुग्णालयात नेले; परंतु करोनाच्या भीतीतून इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यास फार वेळ गेला. या तरुणाला मागील महिन्यातही असाच त्रास झाल्याचे मित्रांनी डॉक्टरांना सांगितले तर, तेव्हाच्या उपचाराची फाईल आणण्यास सांगण्यात आले. या प्रक्रियेत वेळ गेला. अखेर, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सांगितले.
मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता तरुणास दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु त्या हॉस्पिटल प्रशासनाने मित्रांना 49 हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगितले. मित्रांनी दहा हजार रुपये असल्याचे तसेच उर्वरित पैसे नंतर भरतो, अशी विनंती केली. यातही आर्धा तास वेळ गेला. विनवण्या केल्यानंतर तरुणाला दाखल करून घेण्यात आले; परंतु तपासणी केल्यानंतर तरुणाचा 45 मिनिटांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तरुणाला वेळेत उपचार मिळाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. यामुळे मित्र हळहळ व्यक्त करीत आहेत.
डॉक्टर “व्यापारी’…
या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल सोशल मीडियावरून अनेक जण करीत आहेत. करोनाच्या नावाखाली मनमानी कारभार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कोण अंकुश ठेवणार? डॉक्टर ‘व्यापाऱ्यां’ना कोण प्रश्न विचारणार? असे प्रश्न या घटनेतून उपस्थित होऊ लागले आहेत. शासनासह पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामाबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.