पुणे (प्रभात वृत्तसेवा) – करोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून, आणखी 20 रुग्णांची नोंद गेल्या तीन दिवसांत झाली आहे. ही संख्या आता 65 झाली असून, पुणे, मुंबई येथील या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहेच, परंतु नांदेड, गोंदिया, रायगड, चंद्रपूर आणि अकोला येथे नवे रुग्ण सापडले आहेत.
दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने दिल्लीतील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडट्रियल रीसर्च संस्थें’तर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. गेल्या रविवारी ही संख्या 45 इतकी होती.
डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळले होते, त्यानंतर रत्नागिरी आणि मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र आता नव्याने नांदेड, गोंदिया, रायगड, चंद्रपूर, अकोला येथे “डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.
जळगावमध्ये पूर्वी इतकेच म्हणजे 13 च रुग्ण आहेत, मात्र रत्नागिरी मध्ये एक, मुंबईत पाच, ठाण्यात एक, पुण्यात तीन, पालघरमध्ये दोन रुग्णांची वाढ झाली आहे. नांदेड, गोंदिया आणि रायगडमध्ये नव्याने प्रत्येकी दोन रुग्ण आढळले असून, चंद्रपूर आणि अकोल्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
तरुण आणि महिलांची संख्या जास्त
“डेल्टा प्लस’ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या आता महिलांची झाली असून, दोघांच्याही संख्येत वाढ झाली आहे. नव्या आकडेवारीनुसार 32 पुरुष आणि 33 स्त्रियांना याची लागण झाली आहे. याशिवाय डेल्टा प्लसची लागण झालेल्यांमध्ये 19 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्याही वाढळी असून ती 33 झाली आहे. त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या असून ती 17 आहे. तर 18 वर्षाखालील “डेल्टा प्लस’ची लागण झालेल्या बालकांची संख्या सहा वरून सात झाली आहे. तर 60 वर्षे वयापुढील लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
डेल्टाप्लस बाधित जिल्हानिहाय संख्या
जळगाव – 13, रत्नागिरी – 12, मुंबई – 11, ठाणे – 6, पुणे – 6, पालघर – 3, सिंधुदुर्ग – 1, सांगली – 1, नंदूरबार – 1, औरंगाबाद – 1, कोल्हापूर – 1, बीड – 1, नांदेड – 2, गोंदिया – 2, रायगड – 2, चंद्रपूर – 1, अकोला – 1