पुणे – शहरात करोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आणि मंगळवारी सकाळपासूनच खळबळ उडाली. हा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे. असा संदेश सर्वत्र फिरत आहे. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे, अशा आशयाचा संदेश असलेले निवेदन सध्या सोशल मीडियावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा संदेश चुकीचा आहे. संबंधित निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले नाही. ते कोणीतरी खोडसाळपणे तयार केले आहे.
या प्रकारामुळे समाजात अफवा व घबराट पसरण्याचा धोका आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी डाॅ. गणपत मोरे म्हणाले कि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, कोरोना संदर्भात कोणतीही चुकीची माहिती तसेच अफवा व्हॉट्स अॅप अथवा अन्य माध्यमातून पाठवू नये. अशी चुकीची माहिती पाठविल्यास आपण स्वत: जबाबदार राहाल, अशी तंबीही शिक्षकांना देण्यात आली आहे.