मांडवगण फराटा- सादलगाव (ता. शिरूर) येथील पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. संबंधित सादलगाव येथे राहत असून तो पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये लॅबमध्ये काम करत होता. तीन दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तो घरीच राहत होता, असे स्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित रुग्ण येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता; परंतु त्याला पुन्हा तोच त्रास होत असल्याने त्याने आपले स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यात त्याचा अहवाल बुधवारी (दि. 22) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी, मुलगी, भाची अशा 5 जणांचे स्वॅब तपासणीसाठी (दि. 23) पाठवले आहेत.
पूर्व भागातील पिंपळसुटी, मांडवगण फराटा, नागरगाव, गणेगाव दुमालानंतर आता सादलगावात करोनाने शिरकाव केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (दि. 22) दिवसभरात या परिसरातील विविध गावांत तब्बल 10 करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे.