नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आपल्या घरात असून, वर्क फ्रॉम होम आणि घरातील इतर कामे करताना दिसत आहेत.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींना ग्रुप व्हिडीओ कॉल किंवा वन ऑन वन व्हिडीओ कॉलिंगची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. त्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यामुळे अंतर्गत ग्रुप व्हिडीओ कॉल आणि एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करता आली.
ग्रुप व्हिडीओ कॉलिंगमुळे लॉकडाऊनमध्ये ‘झूम’ या व्हिडीओ कॉलिंग अॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान, आता झूमला टक्कर देण्यासाठी फेसबुकने सुद्धा व्हिडीओ कॉलिंग अॅप्सची निर्मिती केली असून, फेसबुकच्या मेसेंजरमध्ये झूम सारखेच एक नवीन फीचर ऍड करण्यात आले आहे. त्यामुळे आता मेसेंजरमध्ये देखील युजर्सला स्क्रिन शेअर करता येणार आहे.
फेसबुकचे हे फीचर अँड्राईड आणि आयओएस मेसेंजर अॅपमध्ये मिळणार आहे. या फीचर अंतर्गत ग्रुप व्हिडीओ कॉल किंवा वन ऑन वन व्हिडीओ कॉलिंग दरम्यान एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करता येईल.