पुणे – गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पाषाणकडे जाणाऱ्या पुलानंतर आता बाणेरकडे जाणाऱ्या पुलावर गुरुवारी हातोडा पडला.
तीन दिवसांपूर्वीच पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यातील अडीच दिवसांत पाषाण रस्त्याच्या बाजूने उतरणारा 33 मीटर रॅम्प आणि 54 मीटर उड्डाणपूल जमीनदोस्त केला. दुसरीकडे बाणेर रस्त्यावर उतरणाऱ्या पुलाचा रॅम्प काढण्याचे काम गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला हाती घेतले. हा संपूर्ण पूल पाडण्यासाठी 25 दिवसांची जी मुदत दिली आहे. त्यातच ते पूर्ण होईल, असा विश्वास “पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार असल्याने या रस्त्यावरील विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्यास नगरविकास खात्याने परवानगी दिली आहे. शिवाय पालिकेनेही पूल पाडण्यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे.
राडारोडा उचलण्याचे काम शिस्तबद्धरितीने
राडारोडा उचलून तो रस्त्याच्या बाजूला टाकणे आणि त्यातून तो उचलून डंपरमध्ये भरणे, असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा त्यांनी खोदकाम केल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने थेट डंपरमध्येच तो राडारोडा भरून त्याची विल्हेवाट लगेचच लावण्यात येत आहे. पावसाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राडारोडा तेथेच राहिला तर पावसाने तो रस्त्यावर पसरेल आणि त्यानंतर तो काढणे कठीण होईल त्यामुळे अशी “आयडिया’ करण्यात आली आहे.