पुणे – एका कुकचे अपहरण करुन त्याच्या मालकाकडे दहा हजारांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले आहे.
मुकेश मनोज जाधव (21,रा.नागपाल रोड), मनोहर काशिराम जाधव( 23,रा.शिरुर), विनोद चव्हाण(चंदननगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गगन अशोक तलवार ( 21,रा.खराडी) असे फिर्यादीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तलवार यांच्याकडे कुक विश्वजीत पाल कामाला येतो. तो जेवण बनवून झाल्यावर घरी दुचाकीवर चालला होता. यावेळी आरोपींनी त्याला खराडी बायपास जवळ मारहाण करुन टमटम रिक्षामध्ये टाकले. यानंतर रिक्षाचे पडदे लावून त्याला चंदननगर येथील जंगल परिसरात नेले. तेथे पुन्हा मारहाण करुन पैशाची मागणी करण्यात आली. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर मालकाकडून पैशाची मागणी करण्यास सांगितले.
त्याने मालकाकडे फोन करुन पैसे मागितले, मात्र पैसे पाठविण्यासाठी ते स्वत:चा गुगल पे नंबर देत नव्हते. सरते शेवटी त्यांनी पुन्हा एकदा मालकाला फोन करुन आम्ही तुझ्या जीवाचे बरेवाईट करणार आहोत असे सांगायला लावले. अखेर मालकाने पोलिसांकडे धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी प्रथम त्याला कोठे नेले याचा तपास करता , त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला सापडली. तेथे चौकशी केली असता, त्याला टमटममधून मारहाण करत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींणी सांगितले.
यानंतर पोलिसांनी जंगल परिसराकडे धाव घेतली असता, तेथे आरोपी कुकला मारहाण करुन डांबून ठेवल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या अवळल्या. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव करत आहेत.