पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – एकीकडे झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देण्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे ठेकेदारानेच बेकायदेशीरपणे 23 मोठ्या झाडांची कत्तल केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार समोर आला आहे.
चिंचवड, मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील सुमारे 23 मोठ्या झाडांची ठेकेदाराने बेकायदेशीपरणे कत्तल केली असतानाही उद्यान विभागाने ठेकेदारावर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अधिकारी ठेकेदाराला वाचवत आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी भरत रामभाऊ पारखी (रा. सुसगाव, मुळशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार इशार जफर शा (रा. निगडी) या ठेकेदाराविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिकेच्या उद्यान विभागाने केवळ 1 सुबाभुळ तोडण्याची परवानगी दिली होती. मात्र, ठेकेदाराने बेकायदेशीरपणे तब्बल 23 मोठ्या झाडांची कत्तल केली. त्यामध्ये फायकस 14, पेल्टाफोरम 6, चिंच 1, सुबाभुळ 1, वड 1 अशा एकूण 23 झाडांची कत्तल करण्यात आली. 23 झाडांची कत्तल होवूनही उद्यान विभागाने केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे शहरातील वृक्षप्रेमींकडून ठेकेदाराला पाठिशी घालण्याच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, उद्यान विभागाकडून 1 ते 2 झाडे तोडण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. ही वृक्षतोड उद्यान विभागाच्या आर्शीवादानेच होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केला जातो. मोहननगर येथील महात्मा फुले उद्यानातील बेकायदेशीरपणे वृक्षतोडणा-यांवर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या उद्यान विभागाच्या भूमिकेमुळे पर्यावरण प्रेमींच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येत आहे. 23 झाडांची कत्तल महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच केल्याचा आरोप आता होऊ लागले आहे.
वृक्षतोडीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दखलपात्र गुन्हा करण्याबाबत उद्यान विभागाला सूचना दिल्या आहेत. वृक्षतोडीबाबत कर्मचाऱ्यांना नोटीस काढली आहे. यात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल.
प्रदिप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त
वारंवार होताहेत वृक्षतोडीचे प्रकार
महापालिकेच्या नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियममध्येही परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर आकुर्डी, काळभोरनगर येथील एका कंपनीने बेकायदेशीर वृक्षतोड केली होती. या कंपनीकडून पालिकेने दंड वसूल केला होता.